परभणी : एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्या व्यक्तींची संख्याही वाढत आहे. चालू आठवड्यात जिल्ह्यातील तब्बल ३ हजार ८६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.
राज्यभरात कोरोनाबाधित रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यात परभणी जिल्ह्यातही गेल्या दीड महिन्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे; परंतु वेळेवर आणि नियमित उपचार घेतल्यास तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या संहितेचे पालन केल्यास कोरोनावर निश्चितच मात करता येते, असे अनेक रुग्णांनी दाखवून दिले आहे. गेल्या आठवडाभरातील कोरोनामुक्त व्यक्तींची आकडेवारी पाहता ही बाब स्पष्ट झाली आहे. १९ ते २४ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ३ हजार ८६० जणांनी कोरोनाला हरविले आहे. त्यात २० एप्रिल रोजी सर्वाधिक म्हणजे ८४२ जणांनी कोरोनाला हरविले आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्यास घाबरून न जाता तातडीने दवाखान्यात जाऊन उपचार घेतले पाहिजेत.
जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेटही २८.६२ टक्के
एप्रिल महिन्यामध्ये परभणी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २८.६२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे सकारात्मक विचार करण्याची गरज आहे.
कोरोनातून बरे होण्यासाठी प्रत्येकाने परिस्थिती स्वीकारली पाहिजे. तरच मनाचा आत्मविश्वास वाढेल. कोरोना होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. मात्र तो झाल्यास परिस्थिती स्वीकारावी. तो कोणत्या स्तराचा आहे, हे ठरवून उपचार घ्यावेत. वैद्यकीय सल्ल्याचे पालन करावे. आपल्या नियंत्रणातील घटक कोणते आणि नियंत्रणाबाहेरचे घटक कोणते हे ठरवून शांत मनाने उपचाराला प्रतिसाद दिल्यास रुग्ण निश्चित कोरोनामुक्त होऊ शकतो.
- संतोष काळे,
मानसोपचारतज्ज्ञ
माझी कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर १३ स्कोर होता. ऑक्सिजन लेव्हल कमी झाली होती. परभणी येथील शासकीय रुग्णालय कोविड सेंटरमध्ये उपचार घेतले. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि चांगले वैद्यकीय उपचार यांच्या जोरावर कोरोनावर मात केली आहे.
- कोरोनामुक्त