लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकापैकी बोंडअळीने बाधित झालेल्या क्षेत्रावरील ८ तालुक्यांतील ४१ हजार २२७ शेतकºयांनी कृषी विभागाकडे ३ डिसेंबरपर्यंत मदतीसाठी अर्ज दाखल केले आहेत.जिल्ह्यात ५ लाख २१ हजार ८७ हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने खरीप पेरणीचे नियोजन केले होते़ त्यापैकी २ लाख ९ हजार ४८ हेक्टर क्षेत्र कापसासाठी प्रस्तावित होते़ प्रत्यक्षात १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे़ बहुतांश भागात कापसाची पहिली वेचणी झाली असून, सर्वसाधारणपणे चार वेचण्या होतात़ मात्र पहिल्याच वेचणीनंतर जिल्ह्यातील कापूस पिकाला शेंद्री बोंडअळीने घेरल्याचे दिसत आहे़ विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्व भागांमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे़ त्यामुळे शेतकरी नव्या संकटात सापडले आहेत़ कृषी विभागाबरोबरच प्रशासनालाही या संकटाची चाहूल लागल्यानंतर उपाययोजनेची कामे सुरू करण्यात आली होती़ तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी विभागाला बोंडअळीग्रस्त भागाचा सर्वे करून बाधीत क्षेत्राचे अर्ज शेतकºयांकडून घेण्यात यावेत, असे आदेश दिले होते़ त्यानुसार कृषी विभागाने शेतकºयांना नमुना जी, एच हे अर्ज तत्काळ सादर करावेत, असे आवाहन केले होते़ त्यासाठी ३० नोव्हेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली होती़ या अर्जासोबत सातबारा, होल्डींग, पीकपेरा प्रमाणपत्र, आधारकार्ड आदी कागदपत्रे जोडून हा प्रस्ताव शेतकºयांना तालुका बीज निरीक्षकांकडे सादर करावयाचा होता़ त्यानुसार शेतकºयांनी आपल्या बाधीत क्षेत्राचे अर्ज कृषी विभागाकडे सादर करण्यास सुरुवात केली़ ३० नोव्हेंंबर रोजी कृषी विभागाच्या कार्यालयाला अक्षरश: यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते़अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकºयांची वाढती संख्या पाहून कृषी विभागाने ३ डिसेंबरपर्यंत बोंडअळीग्रस्त शेतकºयांना तक्रार अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली होती़ त्यानुसार शेतकºयांनी बाधित क्षेत्राचे अर्ज कृषी विभागाकडे सादर केले आहेत़ ३ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील पालम तालुका वगळता ८ तालुक्यातून ४१ हजार २२७ शेतकºयांचे तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत़आता कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यामध्ये बोंडअळीग्रस्त बाधित क्षेत्राचे गावनिहाय सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे़ त्यामुळे कृषी विभागाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरच जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्राची प्रत्यक्षात माहिती समोर येणार आहे़
परभणी जिल्ह्यात ४१ हजार अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 12:57 AM