रमाई घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होतो. शासनाने घालून दिलेल्या नियम व अटीप्रमाणे लाभार्थ्यांचे उत्पन्न असेल आणि इतर नियमांप्रमाणे सर्व बाबी पूर्ण असणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदान मंजूर होते. हे अनुदान चार टप्प्यात वाटप करण्यात येते. शहरात २०१७ -१८ मध्ये नगरपालिकेमार्फत रमाई घरकुल योजना यशस्वीरित्या राबविण्यात आली. गतवर्षी २०१८-१९ मध्ये या योजनेसाठी १५६ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. या अर्जांची छाननी करून सर्व अर्ज जिल्हा निवड समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले. निवड समितीने १८ फेब्रुवारी २०१९ रोजी मंजुरी दिली होती. २०१९-२० या वर्षातही रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी ४८ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. या अर्जांची छाननी जिल्हाधिकारी कार्यालय आणि समाजकल्याण कार्यालय यांनी केली. यामध्ये ४२ लाभार्थी रमाई घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. समाजकल्याण विभागातर्फे पात्र लाभार्थ्यांची यादी नगरपालिकेला पाठविण्यात आली आहे. मंजूर लाभार्थांची यादी प्राप्त होताच पालिकेकडून निधीसाठी तत्काळ पत्र देण्यात आले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत हा निधी मिळाला नसल्याने पात्र लाभार्थी निधीच्या प्रतीक्षेत आहेत.
मार्चअखेर निधी उपलब्ध होण्याची शक्यता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निधी मिळण्यास उशीर होत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, राज्य सरकारकडून हळूहळू सर्व विभागांना निधी दिला जात आहे. मार्चअखेर रमाई घरकुल योजनेसाठी समाज कल्याण विभागाला निधी उपलब्ध होईल, अशी माहिती मिळत आहे.
नव्याने मंजुरी आलेल्या ४२ लाभार्थ्यांसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी लेखी पत्र देऊन पाठपुरावा सुरू आहे. निधी उपलब्ध झाल्यास तातडीने लाभार्थ्यांना वाटप करण्यात येईल.
जयंत सोनवणे, मुख्याधिकारी, मानवत.