परभणी : जिल्ह्यातील रस्ते गुळगुळीत झाले असले, तरी एकाही रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहनाचा वेग सुसाट झाला. परिणामी, वर्षभरात ४४१ अपघात जिल्हाभरात झाले आहेत. या अपघातात २१६ जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे वाहनधारकांना निष्काळजीपणा व ओव्हरटेक चांगलेच महागात पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनांना ब्रेक लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय महामार्गांवर ठीक ठिकाणी गतिरोधक उभारणे गरजेचे आहे.
मागील काही दिवसांपासून वाहनधारकांचे गतीवर नियंत्रण राहिलेले नाही, याच अतिवेगाने जिल्ह्यात अपघात घडत आहेत. विशेष म्हणजे गंभीर जखमींपेक्षा मयतांचा आकडा अधिक आहे. त्यामुळे सध्या अपघात झाला की थेट वाहनधारक प्रवासी यमसदनी जात असल्याचे स्पष्ट होत आहे. सर्वांत जास्त अपघात हे राज्य व राष्ट्रीय महामार्गावर होत आहेत. जिल्ह्यात सध्या वाहनांची संख्या गतीने वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला गाव तेथे रस्ता होत आहे, तसेच ग्रामीणसह शहरातील रस्ते गुळगुळीत झाल्याने वाहनधारकांच्या गतीला नियंत्रण राहिले नाही. परिणामी अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुसरीकडे हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडूनही ठोस पावले उचलली जात नसल्याने अपघात रोखणेही अशक्य आहे. २०२३-२४ या वर्षातील ३६५ दिवसांत ४४१ अपघात घडून त्यात २१६ जणांना आपला जीव गमवावा लागला. हे चिंताजनक आहे.
दिशादर्शक फलकासह, उपाययोजना आवश्यकमद्यपान, निष्काळजीपणे वाहन चालविणे, ओव्हरटेक करणे, रस्त्यावरील खड्डे यासह गुळगुळीत महामार्गावरील गतिराेधकांच्या अभावामुळे जिल्ह्यात दिवसागणिक एक अपघात घडत आहे. यात अनेक कुटुंबांतील कर्त्याचा जीव जात आहे. त्यामुळे प्रशासनाने अपघाताच्या संख्येची दखल घेता प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलकासह अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गतवर्षी २१६ जणांना आपला जीव गमावला आहे.
अपघात रोखायचे, गतिरोधक टाकापरभणी-गंगाखेड, परभणी जिंतूर हे महामार्ग गुळगुळीत झाले आहेत. त्यामुळे या महामार्गावरून दुचाकीसह चारचाकी वाहने सुसाट धावत आहेत. परिणामी दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. या अपघातांना आळा घालण्यासाठी या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवर ठिकठिकाणी गतिरोधक आवश्यक आहे; परंतु हे गतिरोधक उभारले जात नाहीत. त्यामुळे दिवसागणिक अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन या दोन्ही रस्त्यांच्या कंत्राटदारांना आदेशित करून एक किलोमीटरच्या आत प्रत्येक ठिकाणी गतिरोधक उभारण्याचे आदेशित करावे, तरच अपघातांना आळा बसेल.
रस्ता सुरक्षा अभियानाऐवजी पावत्या फाडण्यावर भरप्रशासनाकडून रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. यासाठी पोलिस प्रशासन, आरटीओ विभाग, राष्ट्रीय परिवहन महामार्ग विभाग लाखो रुपये खर्च करते; मात्र जनजागृतीच्या नावाखाली केवळ फोटो सेशन होते. दुसरीकडे शहर वाहतूक शाखा व आरटीओ विभागाकडून जनजागृती करण्याऐवजी दुचाकी व चारचाकी वाहनांकडून पावत्या फाडण्यावरच भर दिला जातो. त्यामुळे सामान्य वाहनधारकांमध्ये रस्ता सुरक्षा अभियानाच्या बाबतीत पुरेशी जनजागृती झालेली नाही. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे.