परभणी : येथील स्वराज्य ट्रेकर्सने आयोजित केलेल्या मोहिमेत जिल्ह्यातील ४६ जणांनी सहभाग नोंदवित कळसुबाई शिखर तसेच हरिश्चंद्रगड सर केला. विशेष म्हणजे, या मोहिमेत ९ बालकांचा सहभाग होता.
राज्यात सध्या पाऊस सुरू आहे. अशावेळी दूरवर पसरलेली ढगांची चादर, त्यात ताठ मानेने उभे असलेले सह्याद्रीतील अभेद्य सुळके, महाराष्ट्रातील एव्हरेस्ट ’कळसुबाई शिखर’, सभोवतालचे अभयारण्य आदी डोळ्यांची पारणे फेडणारा नजारा पाहण्याची संधी मिळते. हीच बाब लक्षात घेऊन ’स्वराज्य ट्रेकर्स, परभणी’चे प्रमुख मार्गदर्शक राजेश्वर गरुड, माधव यादव, दीपक नागुरे यांनी मागील आठवड्यात ’कळसुबाई व हरिश्चंद्रगड ट्रेक’चे आयोजन केले होते. परभणीहून ३७ मोठे व ९ बाल गिर्यारोहक सहभागी झाले होते. २९ ऑगस्ट रोजी पहाटे सर्व ट्रेकर्सनी कळसुबाई शिखर चढण्यास सुरुवात केली. सकाळी ९.३० ते १० च्या सुमारासच सर्वांनी अच्युच्च शिखर सर केले. त्यानंतर रंधा धबधबा पाहून पांचनाई गावात मुक्काम करण्यात आला.
३० ऑगस्ट रोजी हरिश्चंद्रगड सर करण्यात आला. या ठिकाणच्या वास्तू आणि इतिहासाची माहिती ट्रेकर्सनी घेतली.