परभणी : मराठा आरक्षणाची मागणी करत आज सकाळी ११ वाजता पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे ५० युवकांनी गोदावरी पात्रात उडी घेऊन जलसमाधी आंदोलन केले. प्रशासनाने सर्व आंदोलकांना सुखरूप बाहेर काढले आहे.
आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जवळपास ५० आंदोलक पालम- ताडकळस रस्त्यावर गोदावरी नदीवरील पुलावर जमा झाले. यानंतर मराठा आरक्षणाची मागणी करत पुलावरून नदी पात्रात उड्या घेतल्या. यावेळी तेथे तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुरक्षा रक्षक, एक बोट व पट्टीचे पोहणारे तैनात होते. त्यांनी तत्काळ पात्रातून आंदोलकांना बाहेर काढले. आंदोलनात पूर्णा पंचायत समिती सभापती अशोक बोकारे, सदस्य छगन मोरे आदींचा समावेश होता. आंदोलकांनी तहसीलदार श्याम मंडनूरकर यांना मागण्यांचे निवेदन दिले.