परभणी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कार्यालयाने मंजूर केलेल्या कर्जाचा धनादेश देण्यासाठी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी सापळा कारवाईमध्ये बुधवारी पाच हजार रुपयांची लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडून एकाने स्वीकारली. याप्रकरणी दोन आरोपी लोकसेवकांना ताब्यात घेण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, परभणीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही सापळा कारवाई बुधवारी केली. यात तक्रारदार यांच्या आत्याच्या नावे मंडप डेकोरेशन व्यवसायाकरिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित कार्यालय परभणी येथे एक लाख रुपयांचे कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला होता. १३ जुलैला तक्रारदार व त्यांच्या आत्या कार्यालयात आल्या असता जिल्हा व्यवस्थापक चंदू किशनराव साठे यांना भेटल्या. त्यावेळी चंदू साठे यांना सदर कर्जाचा मंजूर धनादेश देण्याची विनंती दोघांनी केली. साठे यांनी धनादेश देण्यासाठी पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार बाह्यस्त्रोत लिपिक अविनाश मुराळकर यांच्याकडे जाऊन भेटले असता त्यांनी कर्ज मंजुरीचा धनादेश देण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावेच लागतील, असे म्हणून लाचेची मागणी त्यांनी केली होती.
याबाबत तक्रारदाराने एसीबी पथकाकडे तक्रार केली. त्यावरून बुधवारी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक चंदू साठे व अविनाश मुराळकर यांनी दहा हजारांची मागणी केली आणि तडजोडीअंती पाच हजार रुपये रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान अविनाश मुराळकर यांनी पंचासमक्ष पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. दोन्ही आरोपी लोकसेवकांना पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध नवा मोंढा ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर, सापळा अधिकारी सदानंद वाघमारे, कर्मचारी चंद्रशेखर निलपत्रेवार, सीमा चाटे, अतुल कदम, कल्याण नागरगोजे यांनी केली.