पाथरी - शहरातील मुख्य रस्त्यावरील मोंढा परिसरात असणाऱ्या एका आडत दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी 2 लाख 28 हजार किंमतीचे सोयाबीनचे 52 कट्टे चोरी केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. या प्रकारामुळे मोंढ्यातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पाथरी शहरात मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. मोंढा परिसरात अरफत ट्रेडिंग कंपनी या नावाचे आडत दुकान आहे. सध्या बाजारात सोयाबीन खरेदी सुरू आहे. अरफत ट्रेडिंगच्या मालकाने देखील मोठ्याप्रमाणात सोयाबीन विकत घेतले होते. बुधवारी सायंकाळी सर्व व्यवहार झाल्यानंतर अरफात ट्रेडिंग बंद करण्यात आली.
दरम्यान, आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास मोंढा परिसरातील एका व्यापाऱ्याला अरफात ट्रेडिंग या आडात दुकानाचे शटरतोडलेले निदर्शनास आले. त्यांनी लागलीच आडात दुकान मालक आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. तसेच डॉगस्कॉड आणि ठसे तज्ञ यांच्या सहाय्याने तपास केला. प्राथमिक अंदाजानुसार येथे खरेदी करून ठेवलेले 31 क्विंटल 28 किलो वजनाचे सोयाबीनचे 52 कट्टे चोरट्यांनी लंपास केले. बाजारभाव 6500 रुपये किलोप्रमाणे 2 लाख 28 हजार रुपये किंमतीचे हे सोयाबीन होते.