२२ मार्च रोजी देशभरात जनता कर्फ्यू लागू झाल्यापासून तालुक्यात लॉकडाऊन सुरू झाले होते. सुरुवातीच्या काळात प्रशासनातील वैद्यकीय, पोलीस व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता बाळगली. बाहेरून तालुक्यात येणाऱ्या नागरिकांचा बंदोबस्त केला होता. तालुक्यातील नागरिकांना घरातच थांबविण्यास यश मिळविले. त्याचबरोबर तोंडावर मास्क, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर ठेवणे यासाठी आग्रह धरला होता. यात प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार बालाजी शेवाळे, तत्कालीन पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय हरबडे, गटविकास अधिकारी विष्णू मोरे यांनी रस्त्यावर उतरून सर्व सहकाऱ्यांना सोबत घेवून कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी नागरिकांनीदेखील सहकार्य केले. याचा सकारात्मक परिणाम आज समोर आला आहे. तालुक्यातील ९४ गावांपैकी ५२ गावांत कोरोनाचा आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आला नाही. यात राजुरा, मापा, ब्राह्मणगाव, हातनूर, वलंगवाडी, सेलवाडी, बोरगाव, कनेरवाडी, केमापूर, पिंपळगाव कुडा, गुळखंड, हट्टा, बोथ, सिंगठाळा आदी ५२ गावांचा समावेश आहे. त्यामुळे या गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखल्याने प्रशासनावरील ताणही हलका झाला.
४२ गावांत ११९ रुग्ण
सेलू तालुक्यातील ग्रामीण भागांतील ४२ गावांत कोरेानाचे ११९ रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. यात वालूर, डुघरा, राव्हा, पारडी, कुपटा, आडगाव, तांदूळवाडी, गव्हा, सिमणगाव, भांगापूर, कान्हड, पिंप्री, वाई, देवगाव, नागठाणा, बोरकिनी, हिस्सी, डासाळा आदी ४२ गावांचा समावेश आहे. या गावांतील रुग्ण व नातेवाईकांनी वेळीच काळजी घेतल्याने गावात होणारा संसर्ग मर्यादित झाला. त्याचबरोबर सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयानेही या रुग्णांसाठी बरीच मेहनत घेतली.
सेलू शहरात २५८ रुग्णे बरे
सेलू शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले. आतापर्यंत २५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचे यामध्ये मोठे यश आहे. शहरात आजपर्यंत २४३ तर ग्रामीण भागात ११९ रुग्ण आढळून आले. त्यातील सेलू शहरात २५८ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत तर बाहेरगावी उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या ६० आहे. सद्यस्थितीत ९ कोरोना रुग्ण असून, दोन कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत तर ७ होम आयसोलेशनमध्ये आहेत.