परभणी : वाहतुकीचे नियम मोडत शहरातील रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली असून वर्षभरात ५४ लाख ५१ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शहरात वाहतुकीच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. वाहतूक शाखेचे अधिकारी- कर्मचारी चौका-चौकात थांबून नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करतात. तरीही वाहतुकीचे नियम पायदळी तुडवित वाहने चालविणाऱ्या वाहनधारकांची संख्या कमी झालेली नाही. येथील शिवाजी चौक, बसस्थानक, रेल्वेस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या भागात वाहतूक कर्मचाऱ्यांचे फिक्स पॉईंट लावले आहेत. त्याचप्रमाणे शहरात दिवसभर वाहनाद्वारे फिरुन गस्त घातली जाते. नो-पार्किंगच्या जागेत वाहन उभे करणे, वाहन परवाना नसणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, विरुद्ध बाजूने वाहन चालविणे यासह वाहतुकीचे इतर नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाते.
शहर वाहतूक शाखेने १ जानेवारी २०२० पासून ते ३१ डिसेंबर २०२० या वर्षभरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर २० हजार ७७९ केसेस केल्या असून त्यातून ५३ लाख २४ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्याचप्रमाणे शहरासह परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनचालकांवरही या शाखेने दंडात्मक कारवाई केली आहे. वर्षभरात २७६ वाहनाचालकांवर अशा पद्धतीने कारवाई केली असून, या वाहनधारकांकडून १ लाख २७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वाहतूक शाखेत २२ पदे रिक्त
शहर वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांची २२ पदे रिक्त आहेत. सध्या सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक ही दोन अधिकाऱ्यांची पदे आणि ३९ कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. या शाखेला पुरेसे मनुष्यबळ मिळाले तर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम सोयीचे होणार आहे. शहराचा वाढलेला विस्तार लक्षात घेता, शहर वाहतूक शाखेतील रिक्त पदे भरण्याची गरज निर्माण झाली आहे.
कारवाई कडक करणार
येत्या वर्षात शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी कडक कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे वाहतुकीच्या नियमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृतीही केली जाणार आहे.
नितीन काशीकर, सहायक पोलीस निरीक्षक