कृषीसाठी दिवसा वीज द्या
परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागात रबी हंगामातील गहू, हरभरा या पिकांना पाणी देण्याची आवश्यकता आहे. मात्र, महावितरणकडून रात्री वीजपुरवठा होत असल्याने गैरसोयीचे होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या वतीने रात्रीऐवजी कृषी पंपासाठी दिवसा वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी होत आहे.
अवैध वाळू उपशाला लागेना लगाम
परभणी : जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध पोलीस व महसूल प्रशासनाकडून कारवाई केली जात असली तरी हा उपसा अद्यापही थांबलेला नाही. गंगाखेड, पूर्णा आणि परभणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा केला जात आहे.
कालव्यांना पाणी सोडल्याने समाधान
परभणी : जायकवाडी आणि निम्न दुधना प्रकल्पांच्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे रबी हंगामातील सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा ही दोन्ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने पिकांना पाणी देणे अत्यावश्यक झाले होते. याच दरम्यान दोन्ही प्रकल्पांच्या कालव्यांना पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला आहे.
बसपोर्टचे काम ठप्प
परभणी : शहरातील बसस्थानक परिसरात उभारल्या जाणाऱ्या बसपोर्टचे काम ठप्प पडले आहे. महामंडळ प्रशासनाने त्रुटी दूर करून त्वरित काम सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
प्रभागात स्वच्छता
परभणी : मनपा प्रशासनाने शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली असून, त्या अंतर्गत प्रभागांतील नाल्यांची सफाई केली जात आहे. दररोज सकाळी स्वच्छता कामगार नेमून दिलेल्या प्रभागात जाऊन स्वच्छतेची कामे करीत आहेत. त्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
घरकुलांना अडथळे
परभणी : जिल्ह्यात वाळूचे दर अजूनही कमी झाले नाहीत. परिणामी घरकूल लाभार्थ्यांची गोची होत आहे. उपलब्ध केलेल्या अनुदानात वाळू खरेदी करून बांधकाम करणे शक्य नसल्याने जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांनी बांधकाम बंद ठेवले आहे.