परभणी : रेल्वे विभागात नोकरी लावतो म्हणून २६ युवकांकडून पैसे घेऊन काही जणांना खोटे नियुक्तीपत्र देत फसवणूक केल्याचा प्रकार फेब्रुवारी २०१८ ते २०२३ यादरम्यान घडला आहे. यामध्ये जवळपास ६२ लाख ३ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध जिंतूर ठाण्यात बुधवारी सायंकाळी गुन्हा नोंद करण्यात आला.
याबाबतची माहिती अशी, जिंतूर आगारातील बसचालक ठकाजी श्रीरंग काळे यांनी या प्रकाराबाबत फिर्याद दिली. ठकाजी काळे हे जिंतूर आगारात चालक पदावर कार्यरत आहेत. पुणे येथील भोसरी प्रशिक्षण केंद्रात एसटी खात्याचे उपमहाव्यवस्थापक अण्णासाहेब गोहत्रे यांच्याशी काळे यांची ओळख होती. २०१८ मध्ये अण्णासाहेब गोहत्रे यांनी त्यांचे मित्र सुनील लोगडे (रा. गोंदिया), सूरज प्रदीप गोमासे (रा. साकोली, भंडारा) हे दोघे आयकर विभागात नोकरीस आहेत, असे म्हणून काळे यांच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर ठकाजी काळे यांची सुनील लुगडे, सूरज गोमासे यांच्याशी मैत्री झाली. त्यावरून त्यांनी काळे यांना विश्वासात घेत रेल्वे विभागात मी नोकरी लावण्याचे काम करतो, असे सांगितले. दिल्ली, मुंबई, कोलकत्ता येथील रेल्वेच्या विविध कार्यालयात घेऊन जात तेथील अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली. त्यावर या दोघांनी काळे यांना नोकरीसाठी उमेदवार बघा, असे सांगितले. या सर्व प्रकारानंतर काळे यांनी उमेदवारांचा शोध घेऊन विश्वास ठेवत उमेदवार शोधले. एकूण २६ उमेदवारांकडून काळे यांनी नोकरी लावण्यासाठी रक्कम घेतली.
असे दिले वेळोवेळी पैसेरेल्वे विभागात ग्रुप सीसाठी दहा लाख व ग्रुप डीसाठी आठ लाख प्रति उमेदवार अशी रक्कम ठरली. तसेच त्यामध्ये कमिशन देण्याचे ठरले. त्यावरून काळे यांनी विविध ठिकाणच्या २६ उमेदवारांकडून नोकरीसाठी पैसे घेतले. जिंतूरला फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरेश गोमासे व सुनील लोगडे यांना बसस्थानकात १४ लाख २० हजार नगदी दिले. या दोघांच्या म्हणण्यानुसार रेल्वे विभागातील नोकरीत असणारे गिरीश कुमार शहा ऊर्फ सतीश चंद्रा हे या मुलांना नोकरी लावणार होते. त्यानुसार सतीश चंद्रा यांच्या खात्यावर ३४ लाख ८२ हजारांची रक्कम वेगवेगळ्या तारखेस ऑनलाइन वळती केली तसेच चंद्रा यांना मुंबईत भेटून १४ लाख ५७ हजारसुद्धा दिले. सूरज गोमासे यांना नागपूर येथे ८ लाख ३८ हजार रुपये डिसेंबर २०१८ मध्ये दिले.
नियुक्तीपत्रात चूक असल्याचे भासविलेजानेवारी २०१९ मध्ये काळे यांनी पाठपुरावा केला. काळे यांनी काही उमेदवारांना सोबत घेत कल्याण मुंबई गाठले. सुनील लोगडे यांनी रेल्वे दवाखाना कल्याण येथे येण्यास कळविले. सतीश चंद्रा, सुनील लोगडे, सूरज गोमासे हे हजर होते. या सर्वांनी मुलांना दवाखान्यात घेऊन जात त्यांची वैद्यकीय तपासणी केली. आता तुम्हाला मेलवर नियुक्तीपत्र मिळेल, असे सांगितले. त्यानंतर ते नियुक्तीपत्र घेऊन सोलापूर, पुणे, जळगाव, भुसावळ या ठिकाणी जाऊन रुजू होण्याचे सांगितले. मात्र, दोन-तीन महिने उलटल्यावर पुन्हा सतीश चंद्रा यांना नियुक्ती पत्रासाठी तगादा लावला असता त्यांनी काही नियुक्तीपत्र ई-मेलवर दिले. मात्र, रुजू होण्याची तारीख २०-२५ दिवसांच्या फरकाने टाकली. काही मुले पुणे येथे काळे घेऊन गेले असता त्यांना चंद्रा यांनी फोनद्वारे सांगितले की, सदरील नियुक्ती पत्रामध्ये चूक झाली आहे. त्यामुळे सध्या मुले रुजू करून घेता येणार नाहीत. पुन्हा दुसरे नियुक्तीपत्र पोस्टाने पाठविण्यात येईल. काही मुलांना पोस्टाद्वारे नियुक्तीपत्र दिले गेले. मात्र, त्यात चूक झाल्याचे चंद्रा यांनी सांगितले.
२६ लाख केले परतअखेर हे नियुक्तीपत्र घेऊन पुणे रेल्वे विभागामध्ये दाखविले असता सदरील नियुक्तीपत्र बोगस असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी खात्री करून सांगितले. त्यावरून काळे यांची व संबंधित मुलांची फसवणूक झाल्याचे समजले. त्यानंतर सदरील रकमेपैकी २६ लाख बँकेद्वारे सतीश चंद्रा, सुरज गोमासे, सुनील लोगडे यांनी काळे यांना परत केले.
संगनमत करून केली फसवणूकअण्णासाहेब नानासाहेब गोहत्रे (रा. नागपूर), सतीश चंद्रा ऊर्फ गिरीश कुमार शहा (रा. मुंबई), सुनील गोपाळ लोगडे, सूरज प्रदीप गोमासे, सिप्रा जयस्वाल यांनी संगनमत करून काळे व संबंधित मुलांची नोकरीचे आमिष दाखवून रेल्वे विभागात नोकरीचे बनावट नियुक्ती प्रमाणपत्र देऊन एकूण ६२ लाखांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यावरून हा गुन्हा नोंद करण्यात आला.