परभणी : कोरोनाचा संसर्ग घटला असला तरी अजूनही ८ गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. एकीकडे ७१४ गावे कोरोनामुक्त झाल्याचे समाधान असले तरी आठ गावे कोरोनामुक्त करण्याची प्रतीक्षाही कायम आहे.
दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी कोरोनाचे अद्यापही समूळ उच्चाटन झालेले नाही. जिल्ह्यातील ७२२ गावांपैकी सद्यस्थितीला ७१४ गावे कोरोनामुक्त झालेली आहेत; मात्र परभणी, पाथरी, जिंतूर आणि सोनपेठ या तालुक्यातील आठ गावांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण उपचार घेत आहे. त्यामुळे हे रुग्ण कोरोनातून बरे झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्हा कोरोनामुक्त होणार आहे. सद्यस्थितीला आठही गावांतील रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांच्यापासून इतरांना कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे.
कोरोनामुक्त गावे
तालुका गावे
परभणी ११७
पाथरी ५०
पूर्णा ८३
जिंतूर १२७
गंगाखेड ९५
मानवत ४९
पालम ६६
सेलू ८७
सोनपेठ ४०
पाच तालुके कोरोनामुक्त
कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असून, एक एक तालुका कोरोनामुक्त होत आहे. सद्यस्थितीत पूर्णा, पालम, सेलू, मानवत, गंगाखेड या तालुक्यांच्या ग्रामीण भागात एकही कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत नाही. त्यामुळे हे तालुके कोरोनामुक्त झाले आहेत.
सावधान, या गावांत पॉझिटिव्ह
तालुका गावे
पाथरीसिमुरगव्हाण, नाथरा
जिंतूरकोक, सावळी
सोनपेठशेळगाव, लासिना
परभणीमांडवा, धर्मापुरी.
जिल्ह्यात घटले चाचण्यांचे प्रमाण
कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर नागरिकांबरोबरच प्रशासनही सुस्त झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात दररोज सुमारे ३ हजार नागरिकांच्या चाचण्या केल्या जात होत्या. सध्या मात्र या चाचण्या ३०० ते ४०० वर आल्या आहेत. शिवाय मागच्या काही दिवसांपासून डेंग्यू आणि मलेरियाची साथ पसरली आहे. या रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांची कोरोना चाचणी न करताच त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.