विठ्ठल भिसे
पाथरी : अतिवृष्टीमुळे अचंबित करणारी घटना मरडसगाव येथे घडली असून एका शेतकऱ्याची 72 फूट खोल विहीर जमीन ढासळून बांधकामासह विहिरीत कोसळली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे 5 लाखापर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
पाथरी तालुक्यात यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पीक परिस्थिती अत्यंत जोमदार होती. मात्र सप्टेंबर महिना सुरू झाला आणि अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसान होऊ लागले. शेतात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे असून विहिरीही पाण्याने तुडूंब भरल्या आहेत.
तालुक्यातील मरडसगाव येथील शेतकरी पांडुरंग श्रीपती चौरे यांच्या पाथरगव्हाण बु शिवरात गट नं २९० मध्ये १२ वर्षांपूर्वी विहिरीचे खोदकाम करण्यात आले होते. ७२ फूट खोल आणि २२ फूट रुंद असलेल्या विहीरीचे कडे टाकून बांधकाम झालेले होते. मागील काही दिवसांपासून जोराचा पाऊस पडत असल्याने विहिरीच्या बाजूची जमीन खचली जाऊन १९ सप्टेंबर रोजी बांधकाम केलेली विहिरी अक्षरशः जमीनदोस्त झाली. विहिरीवर टाकण्यात आलेली विद्युत मोटार पाईपसह जमिनीत गाढली गेली आहे. संबंधित शेतकऱ्याने पंचनामाकरून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.