पावसाळ्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्गखोल्यांच्या दुरूस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यासाठी निधी उपलब्ध असूनही शालेय व्यवस्थापन समित्यांकडून याबाबत हालचाल होत नसल्याने वर्गखोल्या दुरूस्तीसाठीचे प्रश्न प्रलंबित राहिला आहे.
३० लाख रूपयांची दुरूस्तीसाठी तरतूद
जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरूस्तीसाठी जि. प. सर्वसाधारण सभेने यावर्षी ३० लाख रूपयांची सेस फंडामधून तरतूद केली आहे.
त्यामुळे निधीची उपलब्धता असतानाही केवळ शालेय शिक्षण समित्यांच्या उदासीनतेतून यासाठीचे प्रस्ताव आले नाहीत.
यासाठी शिक्षण विभागालाच निर्णय घ्यावा लागणार आहे.
राजकारणामुळे निविदा प्रक्रिया बारगळली
गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या निजामकालीन इमारतीसाठी १ कोटी १० लाखांचा निधी मंजूर झाला ; परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे या कामाची निविदा प्रक्रिया बारगळली. जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील जि.प. शाळेचा चुकीचा प्रस्ताव दाखल केल्यामुळे या शाळेसाठी मंजूर झालेला १ कोटी १० लाखांचा निधी परत गेला आहे.
अशा शाळेत मुले पाठवायची कशी?
मानवत तालुक्यातील रामपुरी बु. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेक वेळा ग्रामस्थांनी मागणी करूनही शाळेची दुरूस्ती केलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना शाळेत कसे पाठवावे? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने कसलीही वाट न पाहता शाळेची तातडीने दुरूस्ती करावी.
- श्रीकृष्ण चव्हाण, पालक
पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही फायदा झाला नाही. त्यामुळे या शाळेत मुलांना पाठवण्यास मन धजावत नाही. आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पालकांची मानसिकता समजून घेऊन शाळेची तातडीने दुरूस्ती करण्याच्या दृष्टिकोणातून हालचाली कराव्यात, अशी मागणी आहे.
- बबन अबारे, पालक