परभणी: जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने शनिवारी येेथील जिल्हा न्यायालय परिसरात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण ७२१ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्याद्वारे ८ कोटी ८६ लाख २ हजार ९८६ रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांच्या पुढाकारातून परभणी व हिंगोली जिल्ह्यातील बँक वसुली, भूसंपादन, कौटुंबिक वादाची प्रकरणे मिटविण्याच्या उद्देशाने शनिवारी जिल्हा न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एफ.के.शेख, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राजेश चव्हाण, जिल्हा सरकारी वकील ॲड.डी.यू.दराडे यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व प्रकारची तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, भारतीय चलनक्षम दस्ताऐवज अधिनियम १८८१, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघाताची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, वीज प्रकरणे (चोरीची वगळून) व पाणी आकार प्रकरणे, वेतन व भत्यांची सेवा विषयक प्रकरणे, महसूल आणि दिवाणी स्वरुपाची इतर प्रकरणे, बँकांची वसुली वाद पूर्वक दाखल प्रकरणे ठेवण्यात आली होती.
अशी काढली निकाली प्रकरणे
यावेळी दिवाणी व फौजदारीमधील एकूण ४३३ प्रकरणे तडजोडी आधारे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये ७ कोटी १५ लाख ९९ हजार ५८९रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच वाद दाखल पूर्व २८८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून एकूण १ कोटी ७० लाख ३ हजार ३९७ रुपयांची वसुली करण्यात आली, असे ७२१ प्रकरणे निकाली काढून ८ कोटी ८६ लाख २ हजार ९८६ रुपयांची वसुली करण्यात आली. सदरील राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी न्यायिक अधिकारी, सदस्य, वकील संघ, कार्यालयीन कर्मचारी व पक्षकार यांचे सहकार्य लाभले.