पाथरी ( परभणी ): लोकसंख्या व उद्दिष्टानुसार रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचे प्रस्ताव आले नसल्याने दाखल झालेले ८०० प्रस्ताव विशेष समाजकल्याण विभागाने फेटाळून लावले आहेत. तसेच गावनिहाय उद्दिष्टानुसार प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पंचायत समितीला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही योजना उद्दिष्टाच्या कचाट्यात सापडल्याचे चित्र तालुक्यामध्ये पहावयास मिळत आहे.
अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांना रमाई घरकूल आवास योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये परभणी जिल्ह्यासाठी ७ हजार घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. या उद्दिष्टापैकी तालुका उद्दिष्ट विशेष समाजकल्याण विभागाने ठरवून दिले आहे. पाथरी तालुक्याला ५८२ घरकुलाचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार पंचायत समितींनी ग्रामपंचायती मार्फत प्रस्ताव मागविले होते. तालुक्यातील ८०० लाभार्थ्यांनी घरकुलासाठीचे प्रस्ताव दाखल केले होते.
या सर्व प्रस्तावांची छाननी करून सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले. मात्र गावनिहाय, मागासवर्गीय लोकसंख्येच्या प्रमाणात प्रस्ताव आले नसल्याची बाब समाजकल्याण विभागाच्या लक्षात येताच दाखल झालेले सर्व ८०० प्रस्ताव पंचायत समितीकडे परत पाठविण्यात आले आहेत. तसेच गावनिहाय मागासवर्गीय लोकसंख्येच्या प्रमाणात प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना पंचायत समितीला दिल्या आहेत. यानुसार तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीला मागासवर्गीय लोकसंख्येच्या प्रमाणात उद्दिष्ट ठरवून दिले आहेत. त्यानुसाच रमाई आवास योजनेसाठी प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत.
प्रतीक्षा याद्याच नसल्याने अडचणरमाई आवास घरकुल योजना आणि इंदिरा आवास योजना या दोन्ही योजनेतून मागासवर्गीयांना घरकुलाचा लाभ दिला जातो. इंदिरा आवास योजनेला प्रतीक्षा याद्या तयार होत्या. मात्र ही योजना बंद पडली. तर रमाई आवास योजनेसाठी प्रतीक्षा यादी नसल्याने प्रस्तावाबाबत अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, समाजकल्याण विभागाने तालुक्याला ५८२ चे उद्दिष्ट देताना ते लोकसंख्येच्या प्रमाणात गावनिहाय ठरवून दिले नव्हते. जास्तीचे प्रस्ताव आल्याने याबाबत नव्याने सूचना देऊन गावनिहाय उद्दिष्टानुसार प्रस्ताव दाखल करण्याचे सांगितल्याने ही प्रक्रिया अधिकच लांबली आहे.
७६ प्रस्ताव वरिष्ठांकडे दाखलपंचायत समिती स्तरावर गावनिहाय्य उद्दिष्टाप्रमाणे दाखल झालेले ७६ प्रस्ताव शासकीय मान्यतेसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहेत. प्रस्ताव सादर करताना नमुना नं. ८, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, जॉबकार्ड, बँक पासबूक, शपथपत्र, कच्च्या घराचे फोटो, ग्रामसभेचा ठराव आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. मात्र अनेक प्रस्तावांमध्ये या त्रुटी आढळून येत असल्याने त्रुटीतील प्रस्ताव बाद होत आहेत. तसेच इंदिरा आवास योजनेत यापूर्वी कुटुंबात लाभ घेणार्या लाभार्थ्यांचे प्रस्तावही अपात्र ठरले आहेत.
पाठपुरावा सुरू आहेपं.स. स्तरावर रमाई आवास घरकूल योजनेसाठी गावनिहाय प्रस्तावाची छाननी करून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या आहेत. या प्रस्तावांना वेळेत मंजुरी मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.-शिवकन्या राजेश ढगे, सभापती पं.स.
छाननी सुरू आहेगावनिहाय लोकसंख्येच्या प्रमाणात उद्दिष्ट ठरवून देण्यात आले असून दाखल प्रस्तावाची त्यानुसार छाननी सुरू आहे.-ए. एफ. शेख, सहायक गटविकास,अधिकारी