परभणी : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत मोफत शाळा प्रवेशासाठी जिल्हाभरातून ८०३ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी शेवटचे तीन दिवस उरले आहेत.
राज्य शासनाच्या वतीने बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत दुर्बल व वंचित घटकातील बालकांनाही मोफत शिक्षण मिळावे, यासाठी २५ टक्के कोट्यातून खाजगी शाळेमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी जानेवारी महिन्यांपासूनच प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये १५२ शाळांची निवड २५ टक्के प्रवेशासाठी करण्यात आली आहे. १५२ शाळांमधूून १ हजार ५०२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. गतवर्षी अनेक पालकांना मोफत प्रवेशाविषयी वेळेवर माहिती मिळाली नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकले नव्हते. त्यामुळे यावर्षी प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करण्यात आली.
१० ते २८ फेब्रुवारी दरम्यान आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. आॅनलाईन अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीसाठी केवळ तीन दिवस उरले आहेत. २५ फेब्र्रुवारीपर्यंत जिल्हाभरातून ८०३ पालकांनी आपल्या पाल्यांचे आॅनलाईन अर्ज भरले आहेत. एकूण जागेच्या तुलनेमध्ये अर्जांची संख्या निम्मीच आहे. आणखी तीन दिवसांमध्ये किती अर्ज सादर होतील, याकडे लक्ष लागले आहे.
कागदपत्रे: काढण्यासाठी धावपळआॅनलाईन अर्ज सादर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी पालकांची धावपळ होत आहे. शहरातील महा-ई-सेवा केंद्रावर गर्दी दिसत आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसामध्ये अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.