परभणी : गत महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील २ लाख ३१ हजार ७८७ शेतकऱ्यांचे ९५ हजार ५३ हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी, हरभरा, कापूस, तूर या पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. या शेतकऱ्यांना मदतीसाठी ८१ कोटी ७५ लाख ४६ हजार रुपये लागणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे सर्वाधिक ४८ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले.
गत महिन्यात २७ व २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी, गारपीट व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे खरीप हंगाम हातून गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामातील पिकांवर होत्या. मात्र, या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी पुरता खचला. त्यामुळे या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मदतीची अपेक्षा होती. त्यानुसार राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला तत्काळ बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयाने संयुक्त स्वाक्षरी अहवाल तयार करण्यासाठी पंचनामे सुरू केले. यामध्ये खरीप हंगामातील कापूस पिकाचे ३३ हजार २२६ हेक्टर क्षेत्र, तर तूर पिकाचे १२ हजार ५१५ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर रब्बी हंगामातील सर्वाधिक हरभरा पिकाचे ४८ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले असून, या शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ निसर्गाने ओढवली. त्यापाठोपाठ केवळ ६९ हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी पिकाचे नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या अंतिम संयुक्त स्वाक्षरी अहवालात नमूद केले आहे. या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने प्रतिहेक्टरी ८ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार आहे. त्यासाठी लागणारा अहवाल प्रशासनाने तयार केला असून, यामध्ये २ लाख ३१ हजार ७८७ शेतकऱ्यांचे ९५ हजार ५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, या नुकसानीपोटी ८१ कोटी ७५ लाख ४६ हजार रुपये लागणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे आता ही मदत केव्हा मिळणार, याकडे जिल्हा प्रशासनासह शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
५८० गावांतील पिकांचे झाले नुकसान२७ व २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट तसेच अतिवृष्टीने जिल्ह्यातील ५८० गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. यामध्ये जिंतूर तालुक्यातील सर्वाधिक १६९, पूर्णा तालुक्यातील ९४, परभणी तालुक्यातील ६५, सोनपेठ तालुक्यातील ५४, मानवत तालुक्यातील ५३, गंगाखेड, पालम ४२, सेलू तालुक्यातील ३० गावांचा या अहवालात समावेश आहे. विशेष म्हणजे जिंतूर तालुक्यातील सर्वाधिक ५९ हजार ९९२ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. तर सर्वात कमी गंगाखेड तालुक्यातील १ हजार १२३ शेतकऱ्यांचे नुकसान यामध्ये दाखविले आहे.
परभणी तालुक्यासाठी लागणार १८ कोटी ११ लाखअवेळी पाऊस व गारपिटीने परभणी तालुक्यातील ६५ गावांतील ३३ हजार ३० शेतकऱ्यांचे हरभरा, कापूस, तूर व ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी परभणी तालुक्याला १८ कोटी ११ लाख ४४ हजार रुपयांची मदत लागणार आहे. तसा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. त्याच पाठोपाठ जिंतूर तालुक्याला १६ कोटी ६४ लाख, पूर्णा तालुक्याला १६ कोटी ८३ लाख, सेलू ४ कोटी ९३ लाख, पाथरी ३ कोटी ५४ लाख, मानवत ९ कोटी ८७ लाख, सोनपेठ ६ कोटी ६४ लाख, गंगाखेड ६५ लाख, तर पालम तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ५० लाख ५० हजार रुपयांची मदत आवश्यक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.