दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत आहे. सुरुवातीच्या काळात २५ ते ३० रुग्णांची नोंद होत होती. ती आता ६० ते ७० रुग्णांवर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
११ मार्च रोजी आरोग्य विभागाला १ हजार ८६ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या ९५० अहवालांमध्ये ६० आणि रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या १३६ अहवालात २२ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका पुरुषाचा गुरुवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात ९ हजार ९९ एकूण रुग्ण संख्या झाली असून, त्यातील ८ हजार ३६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३४० रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या ३९४ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील आयटी हॉस्पिटलमध्ये १०६ रुग्ण उपचार घेत आहेत. खासगी रुग्णालयात ९२ रुग्ण उपचार घेत आहेत. तर होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १८७ असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
या भागात आढळले रुग्ण
परभणी शहरातील विवेकानंदनगर, दर्गा रोड, बाळासाहेब ठाकरेनगर, इंडियन ऑइल परभणी, पोलिस क्वॉर्टर, आशीर्वाद नगर, श्रेयस नगर, दर्गा रोड, विष्णू नगर, स्टेशन रोड, कारेगाव रोड, गवळी गल्ली, गव्हाणे चौक, अंबिका नगर, विकास नगर, वर्मा नगर, मथुरा नगर, रामदास नगर, अमेयनगर, बरकत नगर, विश्वशांती कॉलनी, लोकमान्य नगर, गालिब नगर, माऊली नगर, प्रताप नगर, कृषी सारथी कॉलनी, दत्तधाम, कल्याण नगर या भागात रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे सेलू, जिंतूर, गंगाखेड तालुक्यातही रुग्ण आढळले आहेत.
आर्वी येथे आठ रुग्ण
परभणी तालुक्यातील आर्वी येथे कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. या गावात जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या असून, गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. आर्वी येथे गुरुवारी आणखी नवीन ८ रुग्णांची नोंद झाली आहे.