परभणी : एकाच दिवशी ९ जणांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याला मोठा हादरा बसला आहे़ या ९ रुग्णांमुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या १६ वर पोहचली आहे.
पुणे, मुंबई, औरंगाबाद या रेडझोनमधून जिल्ह्यात दाखल होणा-या नागरिकांमुळे कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे़आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेले सर्वच रुग्ण पुणे आणि मुंबई या ठिकाणावरून परभणीत दाखल झालेले आहेत़ १८ मे रोजी मुंबई येथून परतलेल्या शेळगाव येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली होती़ याच महिलेच्या सोबत आलेल्या इतर ६ जणांचे अहवाल बुधवारी सायंकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत़ त्याचप्रमाणे गंगाखेड तालुक्यातील नागठाणा येथे मुंबई येथून परतलेल्या ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे़ तर पूर्णा तालुक्यातील माटेगाव या ठिकाणीही एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे़ तर परभणी तालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे येथील एका १८ वर्षीय युवकाचा अहवालही बुधवारी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती आरोग्य विभागातून मिळाली़
त्यामुळे बुधवारी एकाच दिवशी सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील ६, गंगाखेड तालुक्यातील नागठाणा येथील १, परभणी तालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे येथील १ आणि पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथे १ असे ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत़ जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता १६ वर पोहचल्याने परभणी जिल्हावासीयांमध्ये चिंता वाढली आहे़