पाथरी : जून महिन्यात पडलेल्या दमदार पावसाने तालुक्यातील ढालेगाव येथील बंधाऱ्यात ९ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेष म्हणजे, मे महिन्याच्या शेवटी या बंधाऱ्यातील पाणी पातळी पातळी शून्य टक्क्यावर होती. मुदगल बंधारा मात्र अद्यापही कोरडा आहे.
पाथरी तालुक्यात गोदावरी नदीच्या पात्रात ढलेगाव आणि मुदगल येथे उच्च पातळीचे बंधारे आहेत. मे महिन्यात या दोन्ही बंधाऱ्यांचा पाणीसाठा अगदी मृत साठ्याला गेला होता. यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच जोरदार पाऊस झाला आहे. पाथरी तालुक्यात आतापर्यंत सरासरी १९४ मि. मी. पाऊस झाला आहे. पाथरी मंडळात २४५ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या पावसावर खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या ७५ टक्क्यापर्यंत झाल्या आहेत. ढालेगाव येथील उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये ९ टक्के पाणीसाठा झाला आहे. मेअखेर बंधाऱ्यात मृत पाणीसाठा होता.
यावर्षी तालुक्यामध्ये सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील झरी येथील तलावपूर्ण भरल्याने या तलावातील ओव्हरफ्लो झालेले पाणी गोदावरी नदीच्या पात्रात जाऊन बंधाऱ्यात साठते. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी साठा वाढला आहे. ढालेगाव बंधाऱ्यात ९ टक्के म्हणजे १.२२० द ल घ मी पाणी साठा झाला आहे. मुदगल बंधारा मात्र अजूनही मृतसाठ्यातच आहे.