सेलू (परभणी) : आई, आजीनी १५ वर्षीय बालिकेस तुला शाळेत टाकायचे म्हणून छत्रपती संभाजीनगरला नेऊन २० ऑगस्टला तिचे लग्न लावून दिले. त्यानंतर पतीने या बालिकेच्या मनाविरुद्ध दोनवेळा अत्याचार करीत तिला मारहाण केली. याप्रकरणी बालिकेच्या फिर्यादीवरून माहेर व सासरकडील १७ जणांवर सेलू ठाण्यात शनिवारी उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
सेलू तालुक्यातील १५ वर्षीय बालिकेस तिचे आई, आजी यांंनी संगनमताने खोटे बोलून छत्रपती संभाजीनगरला शाळेत टाकायचे आहे असे खोटे बोलून नेत दि. २० ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे बालिका अल्पवयीन असल्याचे माहीत असतानादेखील तिचे वडील, आई, आजी, सासरा, सासू व इतर नातेवाईक यांनी रांजणगाव येथील एका मुलासोबत लग्न लावून दिले. त्यानंतर पतीने पीडितेशी बळजबरीने दोन वेळेस अत्याचार केला व पीडितेला मारहाण करून वेगळ्या खोलीत डांबून ठेवले. नंतर पीडित ही सेलू येथे माहेरी आली. नंतर पीडितीच्या घरी येऊन पतीने तिच्या पायाच्या पोटरीवर लाकडी पाटाने मारून दुखापत केली.
पंधरा वर्षीय बालिकेच्या फिर्यादीवरून पो. नि. दीपक बोरसे यांच्या आदेशाने पीडितेचा पती, सासू, सासरे, आई, वडील, आजी यांच्यासह १७ जणांवर शनिवारी गुन्हे दाखल केले आहेत. तपास अधिकारी पोउपनि भाग्यश्री पुरी, सपोनी प्रभाकर कवाळे हे करीत आहेत. यातील दोन आरोपींना अटक केली अशी माहिती पुढे आली आहे.