राजन मंगरुळकर/परभणी : शासकीय शुल्क भरूनही विद्युत जोडणी व विद्युत मीटर बसवून देण्यासाठी तक्रारदाराकडून महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाने तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यामध्ये लाच मागणी पडताळणीदरम्यान संबंधित लोकसेवकाने दोन हजार रुपयांची लाच स्वीकारली. ही सापळा कारवाई बुधवारी मानवतला करण्यात आली. याप्रकरणी आरोपी लोकसेवकास ताब्यात घेण्यात आले. मानवत ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत एसीबी विभागाने दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांनी कृषी साहित्य ठेवण्यासाठी मानवतला नवीन गोदाम बांधकाम केले. नवीन गोदामामध्ये विद्युत मीटर बसविण्यास मानवत महावितरण कार्यालयात अर्ज केला. विद्युत मीटरसाठी आवश्यक असलेले कोटेशन शुल्क भरले. हे शुल्क भरूनही विद्युत जोडणी व मीटर बसवून मिळत नसल्याने त्यांनी नऊ फेब्रुवारीला महावितरण शहर शाखा कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश भोपे यांची भेट घेऊन विद्युत मीटर बसविण्याची विनंती केली. त्यानंतर भोपे यांनी विद्युत मीटर बसवून देण्यासाठी अतिरिक्त तीन हजार लागतील, असे म्हणून लाचेची मागणी केली.
तक्रारदारांनी एसीबी कार्यालयात १२ फेब्रुवारीला तक्रार दिली. बुधवारी पंचासमक्ष पडताळणी कारवाईदरम्यान गणेश भोपे यांनी तडजोडीअंती दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. सापळा कारवाईदरम्यान गणेश भोपे यांनी तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारली. यानंतर संबंधितास ताब्यात घेण्यात आले. मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक अशोक इप्पर, पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे, पोलिस कर्मचारी चंद्रशेखर निलपत्रेवार, अतुल कदम, जिब्राईल शेख, कल्याण नागरगोजे, कदम यांनी केली.