सेलू (जि.परभणी) : शेतात मंगळवारी सकाळी साडेसातला गोठ्याच्या पुढे बांधलेल्या खिलार बैलजोडीच्या अंगावर ११ के.व्ही.ची वीजप्रवाह सुरू असलेल्या तार तूटून अंगावर पडल्याने बैलजोडीचा मृत्यू झाला. ही घटना सेलू तालुक्यातील तिडी पिंपळगाव येथे घडली.
गणेश बाबासाहेब घुमरे (रा. तिडी पिंपळगाव) या शेतकरी युवकाचे गेल्या रविवारी पाथरी बाजारातून १ लाख किंमतीची खिलार बैलजोडी खरेदी केली.नेहमी प्रमाणे या युवकाने रात्री शेतात गोठ्यात बांधलेली बैलजोडी मंगळवारी सकाळी ७:३० वा.बाहेर आणून बांधली. यादरम्यान ३३ के.व्ही.धामणगाव अंतर्गत तिडी पिंपळगाव येथून झोडगाव कडे जाणाऱ्या ११ केव्ही ची विजप्रवाह सुरू असलेली तार तुटून बैलजोडीच्या अंगावर पडली.यामध्ये दोन्ही बैल मृत्युमुखी पडले.
नशीब बलवत्तर असे की, शेतकरी युवक गणेश घुमरे हे बैलजोडी बांधून बाजूला झाल्यानंतर काही वेळेत ही घटना घडली.या घटनेत शेतकऱ्यांचे १ लाखाचे नुकसान झाले.याशिवाय नविन बैलजोडी खरेदी करावी लागणार आहे.घटनेची माहिती पोलिस व महावितरण प्रशासनास दिली. महावितरण विभागाने देखभाल दुरूस्ती जबाबदारी निश्चित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी पुढे येत आहे. लाईनमन सुदाम आढाव, डॉ. पोटभरे ,पोलीस जमादार ज्ञानेश्वर जानकर, सरपंच गोविंद घुमरे,पंच काशिनाथराव घुमरे , खंडेराव घुमरे यांचे उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर पशुवैद्यकीय विभागाकडून शवविच्छेदन केले.