सेलू (जि. परभणी) : घरी कोणीही नसताना दारूच्या नशेत २७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार पुढे आला आहे. हा प्रकार सेलूच्या मौलाना आझादनगर भागात उघडकीस आला आहे.
श्याम रामकिशन काळे असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सेलूच्या मौलाना आझाद नगरात श्याम याने आई-वडील बाहेरगावी गेल्यानंतर बुधवारी रात्री दारूच्या नशेत राहत्या घरी पत्राच्या आडूला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती सेलू पोलिस ठाण्यात मिळाल्यानंतर पोलिस कर्मचारी सुनील वासलवार, वचिष्ठ भिसे, सुरेश पुलादे यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, सेलू येथे नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. युवकाने यापूर्वी दोनवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्याचे काम सेलू पोलिस ठाण्यात गुरुवारी सुरू होते.