गौर : विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पूर्णा तालुक्यातील गौर शिवारात १६ डिसेंबर रोजी दुपारी घडली. गोविंद मारोती मोगले (४६, रा. गौर, ता. पूर्णा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मयत गोविंद मोगले यांची गौर शिवारात सोनार नदीच्या काठावर तीन एकर शेती आहे. शनिवारी ते पिकांना पाणी देण्यासाठी सोनार नदी ओलांडून शेतात जात होते. दरम्यान, दरड चढत असताना त्यांचा तोल गेला आणि विद्युत प्रवाह सुरू असलेली मोटार वायर त्यांच्या हातात आली. यात त्यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने ते नदीत कोसळले. काही वेळाने शेजारील शेतकरी शेतात जात असताना त्यांना हा प्रकार दिसून आला. त्यांनी तत्काळ मयत गोविंद मोगले यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली.
माहिती मिळताच घटनास्थळी कुटुंबासह पोलिस दाखल झाले. या घटनेचा सपोनि. नरसिंग पोमनाळकर, पोउपनि. मारोती फड, पोलिस कर्मचारी डी. पी. काकडे, रामदास चिडेवार यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पूर्णा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी मारोती मोगले यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत गोविंद मोगले यांच्या पश्चात वडील, पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे.