परभणी: मित्राने तंबाखू न दिल्याने रागाच्या भरात रामपुरी बू. येथील एकाने ११२ वर कॉल करून दोन जाणांकडून मारहाण होत असल्याची खोटी तक्रार केली. याप्रकरणी कॉल करणाऱ्या व्यक्ती विरोधात बुधवारी मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस नायक सय्यद फैयाज सय्यद बाबुलाल हे कर्तव्यावर असताना मंगळवारी दुपारी ४:३० वाजता मानवत तालुक्यातील रामपुरी बू. येथील मुंजाजी एकनाथ गायकवाड याने ११२ क्रमांकावर कॉल केला. यामध्ये त्याने दोन व्यक्ती मला मारहाण करीत आहेत. तात्काळ मदत पाठवा असे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस नायक फैयाज सय्यद, नरेंद्र कांबळे, पोलीस वाहन चालक इंगळे यांनी माहिती मिळालेल्यानुसार रामपुरी बू. येथे तातडीने धाव घेतली. गावातील बसस्थानक परिसरातील शनि मंदिराजवळ पोलीस पोहोचले. तक्रारदार मुंजाजी गायकवाड यांची भेट घेऊन विचारपूस केली असता गावातील मित्राला तंबाखू मागितली होती. मात्र त्याने तंबाखू न दिल्याने बाचाबाची झाली. मला कोणीही मारहाण केली नाही, मी रागाच्या भरात ११२ वर कॉल केला होता, असे सांगितले. त्यामुळे ११२ क्रमांकावर कॉल करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलीस नाईक फैयाज सय्यद यांच्या तक्रारीवरून मुंजाजी एकनाथ गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामपुरी बू. येथील दुसरी घटनायापूर्वी तातडीच्या ११२ या क्रमांकावर विनाकारण कॉल करणे तालुक्यातील रामपुरी बू. येथील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले होते. त्याने विनाकारण कॉल केल्याचे निष्पन्न झाल्याने १६ जुलै रोजी त्याच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फेक कॉल करण्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे.