परभणी : जिल्हा पोलीस दलातील गंगाखेडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने पूर्णा शहरातील सिद्धार्थ नगरात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
प्रशांत विश्वनाथ दीपक (३८, रा.सिद्धार्थ नगर, पूर्णा) असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. खेळाडू असलेले प्रशांत दीपक हे १२ वर्षांपूर्वी जिल्हा पोलीस दलात दाखल झाले होते. त्यांनी परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाणे यासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले. सध्या ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गंगाखेड येथे कार्यरत होते. सोमवारी कर्तव्य बजावून रात्री पूर्णा येथील घरी प्रशांत दीपक परतले. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत ते खोलीतून बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी खोली उघडली. यावेळी प्रशांत दीपक यांनी खोलीतील खिडकीला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती नातेवाईकांनी पूर्णा पोलिसांना दिली.
भाऊ अन काका पोलीस दलात मयत प्रशांत दीपक यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. मयत प्रशांत दीपक हे परभणी शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र दीपक यांचे पुतणे तर चारठाणा ठाण्याचे कर्मचारी प्रवीण दीपक यांचे बंधू होत.
घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांची भेटयानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव गावडे, पोलीस निरीक्षक सुभाष मारकड, जमादार मुजमुले, नागनाथ पोते, विष्णू भिसे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. प्रशांत दीपक यांनी नेमकी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सदर प्रकरणी पूर्णा ठाण्यात मंगळवारी सायंकाळपर्यंत कोणतीही नोंद झालेली नाही.