- मोहन बोराडेसेलू (जि.परभणी) : दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची दीड लाखाची बॅग भरदिवसा लंपास केल्याची घटना शहरातील जिंतूर नाका परिसरातील एका खाजगी बँकेसमोर बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. दरम्यान चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून याप्रकरणी सेलूत पोलीस बुधवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारठाणा ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी रामेश्वर नामदेव सरकटे यांनी पीक कर्ज भरण्यासाठी जिंतूर नाक्यावरील तुळजा भवानी एक खासगी बँकेतून बुधवारी दुपारी दीड लाखाची रक्कम खात्यातून काढून एका पिशवीमध्ये ठेवली. बॅकेच्या बाहेर असलेल्या चोरट्यांनी सरकटे यांनी दुचाकीच्या डाव्या हँडलला रक्कम असलेली पिशवी लावली. त्याच वेळी पाळत ठेवून असलेल्या अज्ञात चोरट्यांने पोलीस कर्मचारी सरकटे यांना तुमच्या खिशातून चावी व काही तरी वस्तू खाली पडली म्हणून बतावणी मारली. ते खाली वाकून वस्तू शोधत असतानाच गाडीला अडकवलेली पिशवी घेऊन एक चोरटा पळाला.
दरम्यान, सरकटे यांनी चोरट्याचा पाठलाग केला, मात्र काही अंतरावर उभ्या दुचाकीवरील साथीदारसह चोरटा स्टेशनकडे पसार झाला. तर अन्य दोन चोरटे दुचाकीवरून रायगड काॅर्नर कडे पळाले. अज्ञात चार चोरट्यांनी संगनमत करून ही लुट केली आहे. हा सर्व प्रकार बॅकेच्या जवळ असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला असून घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समाधान चवरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत अज्ञात चोरटे दुचाकीवरून पळून गेले. पोलीस कर्मचारी रामेश्वर सरकटे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरटयांन विरूध्द सेलू पोलीसात बुधवारी राञी उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भरदिवसा पाळत ठेवून चक्क पोलीस कर्मचाऱ्याची दीड लाख रूपये रक्कम असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.