परभणी: जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका नागरिकांसह मुक्या प्राण्यांनाही बसला आहे. पिंपळगाव बाळापुर परिसरातील पूर्णा नदी पात्रातील एका झाडावर २० वानरे दोन दिवसापासून अडकून पडले आहेत. ग्रामस्थांनी ही माहिती महसूल प्रशासनासह वन विभागाला दिल्यानंतर मंगळवारी अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन या वानरांना फळे खायला दिली. त्यामुळे दोन दिवसापासून जीव टांगणीला असलेल्या वानरांना दिलासा मिळाला.
रविवार व सोमवार या दोन दिवशी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख पूर्णा, दुधना, गोदावरी, करपरा, लेंडी या नद्यांना पूर आला. परिणामी, या पुराचा फटका शेती पिकांसह अनेक नागरिकांना बसला. त्याचबरोबर मुक्या प्राण्यांनाही बसल्याचे समोर आले. पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापुर परिसरातून पूर्णा नदी वाहते. या नदी पात्रातील बाभळीच्या झाडावर जवळपास २० वानरे अडकून पडली. सोमवारी सायंकाळी पावसाचा जोर या परिसरात कमी झाल्यानंतर काही शेतकरी आपल्या शेतीमध्ये किती नुकसान झाले हे पाहण्यासाठी निघाले होते. त्यानंतर पूर्णा नदी पात्रातील बाभळीच्या झाडावर वानरे अडकून पडल्याचे त्यांना दिसून आले.
त्यानंतर त्यांनी सोमवारी रात्री ७ ते ८ वाजेच्या सुमारास महसूल प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर मंडळ अधिकारी सुदाम खुणे, तलाठी अजय कटके यांनी मंगळवारी सकाळी नदीपात्राकडे धाव घेतली. सोबतच काही फळे आणली. त्यानंतर आप्पा बनसोडे नारायण बनसोडे प्रल्हाद बनसोडे बलराज बनसोडे भगवान बनसोडे यांच्यासह काही ग्रामस्थांना सोबत घेत या वानरांना ही फळे खाण्यासाठी दिली. त्यानंतर वनविभागाशी संपर्क साधला. मंगळवारी ३ वाजेपर्यंत वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते. त्यामुळे या अधिकाऱ्यांची वाट पाहत ग्रामस्थ व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी बसून होते.
नदीपात्रात पोहून गाठले झाडपूर्णा नदीपात्रातील बाभळीच्या झाडावर दोन दिवसापासून पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या या वानरांना मंडळ अधिकारी व तलाठी यांनी फळे आणली होती. मात्र ही फळे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी नदीपात्रातील पाणी पोहून झाड गाठणे आवश्यक होते. त्यानंतर काही ग्रामस्थांनी या नदीपात्रात उड्या मारत झाड गाठले. या झाडावर जात सोबतची फळे वानरांना खायला दिली.