परभणी : शहरातील वर्दळीच्या असलेल्या रेल्वे स्थानकासमोरील महामार्गावर शिवशाही बसच्या चाकाखाली आल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अंगावरून बस गेल्याने महिलेच्या जागेवर मृत्यू झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय येथून रेल्वे स्टेशन मार्गे बस स्थानकाकडे जाणाऱ्या प्रमुख महामार्गावर हा अपघात घडला आहे. महामार्गावरील दुभाजक ओलांडून रेल्वे स्थानकाकडे येताना हिंगोली येथून परभणी बस स्थानकाकडे जाणाऱ्या बसच्या उजव्या चाकाखाली महिला आल्याचे काही प्रत्यक्ष दर्शिनी सांगितले. घटनेत महिलेच्या अंगावरून चाक गेल्याने संपूर्ण शरीराचा चेंदामेंदा झाला. त्यानंतर सर्व रस्त्यावर रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले.
घटनास्थळी शहर वाहतूक शाखा, नवा मोंढा पोलीस पथकाने धाव घेत सदरील मृतदेह रस्त्याच्या बाजूला करून तो खाजगी रुग्णवाहिकेद्वारे शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. मयत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. अपघातातील शिवशाही बस ही नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आली आहे. याप्रकरणी महिलेची ओळख पटविणे आणि पुढील गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. सहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार, पोलीस उपनिरीक्षक एम.के.पठाण, पोलीस उपनिरीक्षक दीपक, पोलीस कर्मचारी नागनाथ मुंडे अनिल राठोड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मदत कार्य केले.