गतवर्षीपासून कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर गावागावातील शाळा बंद असल्याने, शाळेतील किलबील बंद झाली आहे. त्यातच यंदाही तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून नवीन शैक्षणिक वर्षातही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. जून महिना सुरू झाला की, मुलांना शाळेची चाहूल लागते. शाळेचा परिसर, विद्यार्थी मित्र, शिक्षकवर्गाचे संस्कार यामधून विद्यार्थी घडत असतो. याबरोबरच विविध विषयांच्या माहितीने सजविलेल्या शाळेच्या भिंतीचे योगदानही विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात महत्त्वाचे असते. परिसरातील सावरगाव केंद्रांतर्गत सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भिंतीवर सचित्र अशी रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. शाळेच्या भिंतीवरील इतिहासातील घडामोडींचे चित्ररूपी वर्णन, नकाशातून सूचित केलेले राज्य, देश, जगातील इतर माहिती, गणितीय पाढे, संतवाणी, देशाविषयी माहिती, राष्ट्रगीत, प्रार्थना, याबरोबरच विविध पशुपक्षी व प्राण्यांविषयी सचित्र माहिती विद्यार्थ्यांना जीवनभर मोलाची ठरत असते. म्हणूनच या भिंती प्रत्येक विद्यार्थ्यांना बोलक्या वाटत असतात, परंतु मागील वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. यंदाही शाळा सुरू होण्याबाबत अनिश्चितता दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरातच अडकून पडावे लागत आहे. परिसरातील बहुतांशी शाळेतील शिक्षकांनी लोकवर्गणी व शिक्षकांचा सहभाग या माध्यमातून शालेय परिसराचा कायापालट केला आहे. मात्र, सध्या शाळाच बंद असल्याने शाळेचा परिसर ओस पडला आहे, तर बोलक्या भिंतीही विद्यार्थ्यांविना अबोल झालेल्या दिसून येत आहेत.
विद्यार्थ्यांना शाळेत येताच प्रसन्न वाटावे, यासाठी शाळेच्या भिंतीवर सचित्र अशी आकर्षक रंगरंगोटी करून शाळेच्या बोलक्या केलेल्या भिंती व निसर्गरम्य परिसर विद्यार्थ्यांअभावी ओस पडला आहे.
अनिल सावळे, मुख्याध्यापक जि.प. शाळा ताडबोरगाव
शालेय जीवनात शाळेच्या परिसराशी विद्यार्थ्यांचे घट्ट नाते असते. त्यामुळे आकर्षक रंगरंगोटी करून शाळेच्या बोलक्या भिंती मधून दिलेली माहिती, संदेश यामधून विद्यार्थ्यांना आयुष्यभराची ज्ञानाची शिदोरी मिळत असते .परंतु सध्या शाळाच बंद असल्याने विद्यार्थ्यांविना या भिंती सुन्या सुन्या पडल्या आहेत.
शिरीष लोहट, केंद्रप्रमुख सावरगाव