परभणी शहरातील स्टेशन रोड कन्या प्रशाला परिसरातील भिंतीलगतची तात्पुरत्या स्वरूपातील अतिक्रमणे शनिवारी महापालिका व पोलिसांच्या पथकाने काढली. सकाळी सुरू झालेली मोहीम दुपारपर्यंत सुरू होती. प्रत्यक्षात या छोट्या विक्रेत्यांच्या पोटावर पाय देण्याचे काम पथकाकडून करण्यात आल्याचे दिसून आले. शहरात स्टेशन रोड, गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, जनता मार्केट, नानलपेठ, जिंतूर रोड, पेडगाव रोड या भागातील अतिक्रमणे मात्र पथकाच्या नजरेस पडत नाहीत. याच परिसरात काही वर्षांपूर्वी रस्ते मोकळे करून विद्यानगर पर्यंतची अतिक्रमणे काढली होती. ही अतिक्रमणे आता पुन्हा पक्क्या स्वरूपात झाली आहेत. यामुळे पक्की अतिक्रमणे काढण्यासाठी महापालिकेला कधी जाग येणार हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शिवाजी चौक
या परिसरात एक पोलीस चौकी उभारण्यात आली होती. ती जागा अतिक्रमणमुक्त केली होती. सध्या या ठिकाणी अनेक अतिक्रमणे झाली आहेत. गुजरी बाजार
गुजरी बाजार भागातील ३ ते ४ दुकाने मागील दोन-तीन वर्षांपूर्वी कायमस्वरूपी काढली होती. पुन्हा तेथे दुकाने थाटण्यात आली आहेत.
जुना पेडगाव रोड
जिंतूर रोड ते जुना पेडगाव रोड या रस्त्यावर १०० मीटरपर्यंत २-३ अतिक्रमणे काहींनी स्वतःहून काढली तर काहींची काढावी लागली. यापुढील रस्ता मात्र अतिक्रमणातच व्यापला आहे.
जिंतूर रोड
विसावा कॉर्नर येथून जिल्हा परिषदपर्यंत एकेरी मार्गावर सर्व अतिक्रमणे काढली होती. रस्त्याचा काही भाग या भागातील व्यापाऱ्यांनी दुचाकी तसेच चारचाकी लोखंडी साहित्य रस्त्यावर ठेवून व्यापला आहे. याकडे दुर्लक्ष झाले आहे.
ग्रँड कॉर्नर, अपना कॉर्नर
शहरातील सर्वात जुन्या भागातील ग्रँड कॉर्नर, अपना कॉर्नर व जुना मोंढा येथील पक्की अतिक्रमणे अनेकदा काढली तरीही तेथे सध्या अतिक्रमणांनी बस्तान बांधले आहे.
प्रभाग समिती, स्वच्छता विभाग नावालाच
शहरातील तीन प्रभाग समिती व स्वच्छता निरीक्षक यांच्या अंतर्गत शहराचे विभाजन केले आहे. परंतू, त्यांच्या नजरेस यातील एकही अतिक्रमण दिसून येत नाही. हे पथक केवळ कागदावरच कार्यरत आहे. त्यामुळे कधीतरी नावालाच कारवाई करून किरकोळ अतिक्रमणांवर घाला घातला जातो.