रब्बी पेरण्या अंतिम टप्प्यात
परभणी : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या असून, आता पेरण्यांना वेग आला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी हंगामावरच आहे. त्यामुळे गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी केली जात आहे. १५ डिसेंबरपर्यंत गव्हाची पेरणी करता येईल, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.
वाहनतळाअभावी वाहतुकीची समस्या
परभणी : शहरात बाजारपेठ भागात पुरेशा प्रमाणात वाहनतळाची जागा उपलब्ध नसल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. मध्यंतरी मनपाने वाहनतळाच्या जागा निश्चित करुन दिल्या होत्या. मात्र या जागांवर अतिक्रमणे झाली असून, वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत. त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.
स्वेटर विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा
परभणी : यावर्षी जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली नसल्याने स्वेटर विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. येथील सीटी क्लबच्या मैदानावर विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. मात्र ग्राहकच नसल्याने या विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. आता चार दिवसांपासून थंडीत वाढ झाल्याने ग्राहक खरेदीसाठी बाजारपेठेत दाखल होतील, अशी आशा या विक्रेत्यांना आहे.
रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण
परभणी : येथील ममता कॉलनी भागात डांबरी रस्त्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांची अनेक दिवसांची रस्त्यांची समस्या मार्गी लागली आहे. रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
भुयारी गटार योजनेची प्रतीक्षा
परभणी : शहरात अद्यापही भुयारी गटार योजना नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला असून, सांडपाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तेव्हा शहरासाठी भुयारी गटार योजनेच्या प्रस्तावासाठी पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे.
फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा
परभणी : शहरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या कार्यालयासमोर दररोज ग्राहकांची रांग लागत असून, फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा उडत आहे. ग्राहक रस्त्याच्या कडेलाच रांग लावून बँकेचे व्यवहार पूर्ण करीत आहेत. विशेष म्हणजे, रांगेत असलेले बहुतांश ग्राहक मास्कचाही वापर करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.