पालम तालुक्यातील पेंडू बु. येथील सरपंच अतुल धुळगुडे यांनी १० ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास पालम येथील महावितरणचे कर्मचारी राजेश सुभाष तिवार यांना गावातील वीजपुरवठा बंद झाला असल्याचे मोबाइलवर सांगितले. त्यानुसार तिवार हे सहकारी कर्मचारी अमोल गरदंडमारे यांना सोबत घेऊन पेंडू बु. या गावी गेले. दुपारी २ च्या सुमारास ते गावातील डीपी दुरुस्त करीत असताना गावातील मोकिंद रामराव धुळगुडे हा तेथे आला व त्याने लाइट कधी चालू होईल, अशी विचारणा केली. त्यावर तिवार यांनी थोडा वेळ लागेल, असे सांगून तुमच्या गिरणीची विजेची ११ हजारांची थकबाकी भरा, असे सांगितले. त्यावर आरोपी मोकिंद रामराव धुळगुडे याने थकबाकी भरणार नाही, काय करायचे ते करा, असे प्रतिउत्तर दिले. त्यानंतर महावितरणचे कर्मचारी गिरणीचा वीजपुरवठा खंडित करीत असता मोकिंद धुळगुडे तेथे आला व त्याने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत राजेश तिवार यांनी पालम पोलीस ठाण्यात १० ऑगस्ट रोजी फिर्याद दिली. त्यावरून आरोपी मोकिंद रामराव धुळगुडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:22 AM