परभणी : कोरोनाच्या संसर्ग काळात अनाथ झालेल्या ७०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलण्याचा संकल्प भारतीय जैन संघटनेने केला असून, त्यादृष्टीने विद्यार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती या संघटनेचे राज्य सदस्य ॲड. झेड. आर. मुथा यांनी दिली.
कोरोनाच्या संसर्गकाळात अनेक कुटुंबीयांवर मोठे आघात झाले. काही जण कोरोनामधून सुखरूप बाहेर पडले; परंतु काही जणांना मात्र आप्तस्वकीयांना गमवावे लागले. कोरोनामुळे आई किंवा वडील यांचे निधन झाल्याने अनेक बालके अनाथ झाली आहेत. हे विद्यार्थी सध्या तणावाखाली जीवन जगत आहेत. त्यांना दैनंदिन शिक्षणाबरोबरच मानसिक तणावातून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यात आत्मविश्वास वाढवणे, त्यांना मोठी स्वप्ने दाखवणे व ती साकार करण्यासाठी सक्षम करणे यासाठी भारतीय जैन संघटना प्रयत्न करणार आहे. याअंतर्गत भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. त्या जिल्ह्यातील कोविडमुळे आई किंवा वडील अथवा आई व वडील असे दोन्ही छत्र हरपलेल्या पाचवी ते बारावीपर्यंत मराठी माध्यमाचे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणार आहे. विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविण्याची संमती पालकांकडून घेतली जाणार आहे. तसेच जिल्हाधिकारी यांची याबाबत परवानगी घेतली जाईल, असे मुथा यांनी सांगितले.
तीस वर्षांपासून कार्य
भारतीय जैन संघटना मागील ३० वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीच्या क्षेत्रात कार्य करीत आहे. मार्च २०२० पासून मोबाइल डिस्पेंसरी सेवा, मिशन झिरो, प्लाज्झा डोनर्स जीवनदाता योजना, रक्तदान चळवळ, सेरो सर्व्हेलन्स, कोविड केअर सेंटर, मिशन लसीकरण, मिशन ऑक्सिजन बँक आदी उपक्रम संघटनेने राबविले आहेत, तर यापूर्वी भारतीय जैन संघटनेने लातूर भूकंपातील १२००, मेळघाट व ठाण्यातील १ हजार १०० आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे ७०० मुले अशा ३ हजार विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्याचे काम केले आहे.