परभणी : जुन्या मालकाच्या नावे असलेले विद्युत मीटर हे तक्रारदार यांच्या नावे करताना काम लवकर होण्यासाठी महावितरणच्या शहर उपविभागातील झोन तीनअंतर्गत दोन कर्मचाऱ्यांनी तक्रारदारास लाचेची मागणी केली. एसीबी पथकाने शुक्रवारी केलेल्या सापळा कारवाईमध्ये एका आरोपी लोकसेवकाने तक्रारदार यांच्याकडून एक हजार ६०० रुपयांची लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. त्यावरून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत कोतवाली ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पूर्ण झाली.
महावितरण शहर उपविभाग झोन तीनअंतर्गतचे कनिष्ठ कार्यालयीन सहायक ज्ञानेश्वर सखाराम लहाने आणि बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ जयश्री तुळशीराम चव्हाण असे लाच स्वीकारलेल्या दोघांची नावे आहेत. यातील तक्रारदार यांनी विकत घेतलेल्या घराचे विद्युत मीटर हे जुन्या मालकाच्या नावे होते. हे विद्युत मीटर तक्रारदाराच्या नावे होण्यासाठी त्यांनी ऑनलाइन अर्ज व त्याचे शुल्क भरून प्रिंट काढली. सदरील प्रिंट व शुल्क भरल्याची पावती देण्यासाठी ते गुरुवारी महावितरण कार्यालय झोन तीनला गेले होते. यावेळी आरोपी लोकसेवक जयश्री चव्हाण यांनी तक्रारदार यांच्याकडून ऑनलाइन अर्ज प्रत स्वीकारून त्यावर पोच देऊन तुमचे काम होण्यासाठी तीन महिने लागतील. जर तुम्हाला तुमचे काम लवकर करून घ्यायचे असेल तर खर्च लागेल, असे म्हणून लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबी विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीवरून गुरुवारी केलेल्या पडताळणी कार्यवाहीमध्ये आरोपी लोकसेवक जयश्री चव्हाण यांनी ज्ञानेश्वर लहाने यांच्या सांगण्यावरून एक हजार ६०० रुपयांच्या लाचेची मागणी पंचांसमक्ष केली.
याबाबत शुक्रवारी केलेल्या सापळा कारवाईमध्ये तक्रारदार यांच्याकडून संबंधित कार्यालयामध्ये जयश्री चव्हाण यांनी ही लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. त्यावरून एसीबी पथकाने या दोघांनाही ताब्यात घेतले. पुढील कारवाई कोतवाली ठाण्यात गुन्हा नोंद करण्याबाबत रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही सापळा कारवाई पोलिस उपअधीक्षक अशोक इप्पर, पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे, पोलिस कर्मचारी चंद्रशेखर निलपत्रेवार, सीमा चाटे, कदम यांनी केली. दरम्यान, शनिवारी लाच प्रकरणातील दोघांना परभणी न्यायालयात हजर करण्यात आले.