पूर्णा : पूर्णा- नांदेड रस्त्यावरील गौर शिवारात वाळूची चोरटी वाहतूक करणारे एक टिप्पर पलटी झाल्याची घटना २ जानेवारी रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास उडघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्णा ते गौरपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले आहे. रस्ता चांगला असल्याने या रस्त्याने वाहने सुसाट वेगाने धावतात. शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास याच रस्तावरील गौर गावाच्या प्रवेश कमानीजवळ वाळूची अवैध वाहतूक करणारे एक टिप्पर (एम.एच.- ४३ ई- ०७९४) पलटी झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चुडावा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी देवकते, जमादार सूर्यकांत केसगीर, जमादार पंडित पवार, पोलीस कर्मचारी प्रवीण टाक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे अजून निष्पन्न झाले नसून ही वाळू कोठून आणली होती, हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी बेजबाबदारपणे वाहन चालविणे, वाळूची चोरटी वाहतूक करणे, अशा विविध कलमांद्वारे अज्ञात चालकाविरुद्ध चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार केसगीर तपास करीत आहेत.