- सत्यशील धबडगेमानवत (परभणी) : तालुक्यातील रत्नापूर शिवारात मानवत-पाथरी रस्त्यावर 8 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर झाल्याची घटना घडली. प्रकाश भिमराव मुजमुले आणि आदेश भागवत मुजमुले अशी मृतांची नावे आहेत. मृत आदेश याच्या आई- वडिलांचा रविवारी अपघात झाला होता. त्यांना भेटून परत जात असताना आदेशचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग 61 वर मानवत पाथरी रस्त्यावरून पोहनेर ( ता परळी ) येथील प्रकाश भिमराव, (21)भरत प्रभू मुजमुले,( वय 25) आदेश भागवत मुजमुले हे आपली दुचाकी क्रमांक एम एच 21 यू 6376 वरून पाथरी कडे जात होते. जायकवाडी वसाहत परिसरात या तरुणांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिन्ही तरुण गंभीर जखमी झाले. या तरुणांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयाय दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासून प्रकाश भिमराव मुजमुले यास मृत घोषित केले. तर इतर दोघांना अधिक उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे आदेश भागवत मुजमुले यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, जखमी भरत प्रभू मुजमुले याच्यावर उपचार सुरु आहेत.अपघाताची माहिती मिळताच पोनि रमेश स्वामी, पोउनि किशोर गावंडे, शेख मुनू नारायण सोळंके, भारत नलावडे, नरेंद्र कांबळे, राजू इंगळे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून अपघातास कारणीभूत वाहनाचा तपास सुरु आहे.
अपघातग्रस्त आईवडिलांना भेटायला आला होता मुलगा आदेश भागवत मुजमुले याच्या आई-वडिलांचा 7 मे रोजी रामेटाकळी शिवारात पाथरी-पोखरनी रस्त्यावर अपघातात झाला होता. यात दोघेही जखमी असून मानवत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना भेटण्यासाठी आदेश इतर दोघांसह मानवतला आला होता. भेटून परत जाताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.