पाथरी ( परभणी) : नातेवाईकाच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम करून गावी परतणाऱ्या एका 63 वर्षीय जेष्ठ नागरिकाचा अपघातातमृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हदगाव बु पाटीजवळ घडली. मुरलीधर आसाराम घाडगे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण बुद्रुक येथील मुरलीधर आसाराम घाडगे ( 63) हे गुरुवारी आपल्या मेहुण्याच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमास खेरडा येथे आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास घाडगे यांनी भाऊ सूर्यकांत यास फोन करून हदगाव पाटी येथे गाडी घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर मुरलीधर घाडगे हे हदगाव पाटी येथे येऊन थांबले. मात्र, साडेनऊ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी तेथून जाणाऱ्या हदगाव येथील विठ्ठल नखाते यांनी ही माहिती पाथरगव्हाण येथील ज्ञानेश्वर घाडगे यांना दिली. त्यांनी जखमी मुरलीधर यांना पाथरी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर ज्ञानेश्वर घाडगे यांनी मुरलीधर यांचे भाऊ सूर्यकांत घाडगे यांना अपघाताची माहिती देत पाथरी येथे बोलावून घेतले.
दरम्यान, पाथरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मुरलीधर घाडगे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सूर्यकांत आसाराम घाडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बीट जमादार कदम करत आहेत.