पालम : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत महिनाभरापासून खातेदारांना नवीन पासबुक मिळत नाही. त्यामुळे आर्थिक व्यवहार व शासकीय कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पासबुक स्टेशनरी नसल्याची माहिती दिली जात आहे. तसेच एका लाखापेक्षा जास्तीची रक्कम मिळत नसल्याने रोज वादावादी होत आहे.
पालम शहरात लोहा रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. ही बँक शाखा जुनी व राष्ट्रीयीकृत असल्याने बहुतांश खातेदारांचे खाते या ठिकाणी आहेत. यामध्ये व्यापारी, नोकरदार, शेतकरी, महिला बचत गट यांचे खाते मोठ्या प्रमाणात आहेत. बँकेत आर्थिक व्यवहार करताना पासबुक बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक खातेदारांना पासबुक मिळाले नाहीत. त्यामुळे व्यवहारात अडचणीत निर्माण होत आहेत. बँकेत पासबुकची मागणी केल्यास स्टेशनरी नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच नेहमीच चलन तुटवडा निर्माण होत असून, खात्यावर पैसे जमा असूनही रोकड उपलब्ध होत नसल्याने अडचण निर्माण होत आहे. जेमतेम एक लाख रुपये खातेदाराला दिले जात आहेत. त्यामुळे खातेदार व रोकडपाल यांच्यात वादावादी होवून गोंधळ उडत आहे.