लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पोलिसांना धक्का देऊन पळून गेलेल्या आरोपीस १५ तासांमध्ये परत पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. १ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता या आरोपीला मोंढा परिसरातून अटक करण्यात आली.जीवे मारण्याच्या आरोपावरुन आनंद लक्ष्मणराव साळवे या आरोपीला नानलपेठ पोलिसांनी अटक केली होती. ३१ जुलै रोजी आनंद साळवे याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दोन पोलीस कर्मचारी त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. तपासणी पूर्ण झाल्यानंतर सरकारी दवाखाना परिसरातील एका खानावळीतून पोलिसांना धक्का देऊन हा आरोपी फरार झाला होता. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आरोपीने पलायन केले. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने या आरोपीचा तपास सुरु केला तेव्हा १ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मोंढा परिसरामध्ये तो मिळून आला. स्थागुशाचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान जक्केवाड, सखाराम टेकुळे, संजय शेळके, शाम काळे, यशवंत वाघमारे आदींनी ही कारवाई केली. आरोपीस न्यायालयासमोर उभे केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पंधरा तासांतच पकडला आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:16 AM