परभणी : दोन वर्षांपूर्वी घडलेल्या ऑनर किलिंग प्रकरणात पूर्णा पोलिसांना हव्या असलेल्या एका आरोपीला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी रात्री परळी येथून अटक केली आहे.
परळी येथील अजय अशोक भोसले (१७) या युवकाचे पूर्णा येथील रेल्वेस्थानक परिसरातून अपहरण करून परळी येथे त्याचा खून केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. मयत तरुण अजय याची आई मंगलबाई भोसले यांनी परळी येथील पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा दखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण पूर्णा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. तत्कालीन पोलीस अधिकारी तथा फौजदार चंद्रकांत पवार यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यात प्रेम प्रकरणातून अजय याचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची बाब समोर आली होती.
या प्रकरणात ६ आरोपी निष्पन्न झाले होते. आरोपी रुजूबाई बावरी, शक्तीसिंग बावरी, बच्चन सिंग बावरी, चरणसिंग बावरी, यांच्यासह या प्रेम प्रकरणातील मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर मयत अजय याचा मृतदेह शोधून काढण्यात आला. या प्रकरणाच्या काही दिवसांनी प्रेम प्रकरणातील मुलीनेही आत्महत्या केली होती. अजय याच्या खून प्रकरणात पोलिसांनी शक्तीसिंग बावरी, बच्चनसिंग बावरी, चरणसिंग बावरी यांना अटक केली होती. सध्या हे आरोपी जेलमध्ये आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपी घमंडसिंग सुरजसिंग जुन्नी, राजुसिंग जुन्नी हे २ वर्षांपासून फरार होते. त्यातील घमंडसिंग जुन्नी हा परळी येथे असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. त्यावरून १० डिसेंबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर आरोपीला पूर्णा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.