परभणी : नवा मोंढा ठाण्याच्या हद्दीत बलसा, खानापूर नगरात घरफोड्या, दरोडा टाकणारा आरोपी पोलिसांनी शहरातील साखला प्लॉट भागातून सापळा रचून ताब्यात घेतला. दोन्ही गुन्हे या आरोपीने इतर तीन साथीदारांच्या मदतीने केल्याचे कबूल केले. आरोपीकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
शहरातील बलसा व खानापूरनगर येथे २५ जुलैला घरफोडी व दरोड्याची घटना घडली होती. याप्रकरणी नवा मोंढा ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद झाले होते. घटनेतील आरोपीच्या शोधासाठी पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हा शाखेला आदेश दिले होते. गुरुवारी स्थानिक गुन्हा शाखेला मिळालेल्या माहितीवरून राहुल विठ्ठल भोसले (रा.सुखी पिंपरी, ता.पूर्णा) हा आरोपी साखला प्लॉट येथे असल्याचे समजले.
त्यावरून अधिकारी, अंमलदारांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीस नवा मोंढा ठाण्यात हजर केले. अन्य तीन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे त्याने कबूल केले. इतर तीन आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक पी.डी. भारती, पोलिस उपनिरीक्षक जी.ए. वाघमारे, अजित बिराजदार, कर्मचारी रवी जाधव, दिलावर खान, शेख रफियोद्दीन, नीलेश परसोडे यांनी केली.