सेलू : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पोलीस आणि नगर पालिका प्रशासनाच्या वतीने नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. १० दिवसांत ४४६ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मार्च महिन्यात अचानक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून मास्क आणि फिजिकल डिस्टन्सचे पालन नागरिकांनी करावे, असे आहवान वारंवार केले जात आहे. परंतु, काही नागरिक विनामास्क बिनधास्तपणे फिरत आहेत, तर काही दुकानांवर मोठी गर्दी होत आहे. नगर पालिका आणि पोलीस प्रशासनाने ५ मार्चपासून कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील जिंतूर नाका, रायगड काॅर्नर, गोविंदबाबा चौक, क्रांती चौक या भागात पथके तैनात केली आहेत. लाॅकडाऊन काळात दुकान सुरू ठेवलेल्या दोन जणांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड लावण्यात आला आहे.
१० दिवसांत ४४६ जणांवर दंडात्मक कारवाई करून ९९ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेचे उपमुख्याधिकारी अक्षय पल्लेवाड यांनी दिली आहे. तसेच कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी दोन पथके स्थापन करून त्यात प्रत्येकी ६ कर्मचारी देण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे, सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे, सरला गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक जसपालसिंग कोडतीर्थवाले तसेच पालिकेचे जी. बी. जोशी, सुरेश भांडवले आदी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.