परभणी : पालम शहरातील शिक्षक कॉलनी भागात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने २९ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून सात जणांविरुद्ध कारवाई केली आहे. या छाप्यात २ लाख ५ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पालम शहरातील शिक्षक कॉलनी परिसरामध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे २९मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी सात जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून १५ हजार ७० रुपये नगदी, पाच मोबाईल आणि दोन मोटरसायकल असा २ लाख ५ हजार ९७० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
जुगार खेळणाऱ्या इरफान खान फारुख खान पठाण, मगदूम लाडजी कुरेशी, वहिद खान युसूफ खान पठाण, महेंद्र अमृत रोहिणकर, वैजनाथ शंकरराव हत्तींबिरे, बाळासाहेब उत्तमराव बाबर आणि सय्यद साजिद सय्यद रहीम अशा सात जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पालम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. जी. पांचाळ, सखाराम टेकुळे, हनुमंत कछवे, श्रीकांत घनसावंत, पोलीस मुख्यालयातील हवालदार जगदीश रेड्डी, अब्दुल रियाज, पूजा भोरगे, दीपक मुंडे यांच्या पथकाने केली.