परभणी : शहरातील नानलपेठ ठाण्याच्या हद्दीतील गुंड शेर खान उर्फ शेऱ्या पठाण यास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव नानलपेठचे पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांनी पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. त्यानुसार इसमास स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी यांनी दिले आहेत.
सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या अनुषंगाने धोकादायक प्रकारे कार्यरत असलेल्या गुन्हेगारी कृत्ये व परभणी शहरात स्वतःची दहशत पसरवणाऱ्या तसेच दादागिरी करणाऱ्या इसमाविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. नानलपेठ ठाण्याच्या हद्दीतील गुंड प्रवृत्तीचा इसम शेर खान उर्फ शेऱ्या समंदर खान पठाण (२४, रा.नांदखेडा, ह.मु.खंडोबा बाजार) यास स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव नानलपेठ पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांनी पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी यांनी हे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी गंभीर स्वरुपाचे गुन्हेस्थानबद्ध इसम शेर खान याच्यावर खूनाचा प्रयत्न करणे, धारदार व घातक हत्यारांनी साधनांनी गंभीर दुखापत पोहोचवणे, सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने कृत्य करणे, फौजदारी पात्र धाकदपटशा करणे, भारतीय हत्यार कायद्याखाली अग्नीशस्त्र बाळगणे आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल होते. त्याचा प्रतिबंध होण्यासाठी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली. तरीही त्याच्या गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवला. त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी यांनी सदरील इसमास स्थानबद्ध करून छत्रपती संभाजी नगर येथील हर्सूल जिल्हा कारागृहात ठेवण्याबाबतच्या आदेश निर्गमित केले.
यांच्या पथकाने घेतले ताब्यातपोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार, कर्मचारी रवी जाधव, बाळासाहेब तूपसुंदर, रफीयोद्दिन, निलेश परसोडे यांनी स्थानबद्ध इसमास खंडोबा बाजार परिसरातून ताब्यात घेतले व नानलपेठ ठाण्यात पुढील कार्यवाही कामी हजर केले. त्यानंतर स्थानबद्ध इसमास हर्सूल जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले.
थेट पोलिसांशी संपर्क साधापरभणी शहराच्या सार्वजनिक शांततेसाठी हा आदेश महत्त्वाचा ठरणार आहे. यापुढे जिल्ह्याच्या सार्वजनिक शांततेत धोका निर्माण करणाऱ्या, सामान्य जनतेस वेठीस धरणाऱ्या, अवैध धंदे तसेच प्रशासनास वेठीस धरणाऱ्या गुंड प्रवृत्तीचे समुळ उच्चाटन केले जाणार आहे. अशा गुंड लोकांविषयी काही माहिती असल्यास किंवा अशा लोकांकडून सामान्य जनतेस त्रास होत असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून कायदेशीर तक्रार दाखल करावी. अशा प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.