परभणी : समृद्धी बजेट अंतर्गत विविध योजनांचा लाभ प्रत्येकाने घ्यावा तसेच नरेगातील कामे करून घेण्यासाठी तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा, असे आवाहन शेतकऱ्यांना करत असतानाच काम न करणाऱ्या मुजोर कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात २० जुलै रोजी सेंद्रिय शेतीसंदर्भात शेतकऱ्यांसोबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी टाकसाळे बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, शिवराम घोडके, नरेगाचे गटविकास अधिकारी जयंत गाडे, अमित राठोड, सचिन खुडे, विष्णू मोरे, सुहास कोरेगावे आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
टाकसाळे म्हणाले, शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने सेंद्रिय शेती करणे गरजेचे आहे. आर्थिक सुबत्ता मिळविण्यासाठी सेंद्रिय शेतीचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवराम घोडके यांनी सेंद्रिय शेतीसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.