परभणी : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या अंतर्गत आज शहरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. मात्र, यात शहरातील विविध भागात दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती आटोक्यात आणली़
परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात आज सकाळी १० वाजता मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात बंदचे आवाहन करण्यात आले नव्हते़ परंतु, सकाळपासून शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती़ काही शाळांना सुट्याही देण्यात आल्या होत्या़ शहरातील डॉक्टरलेन भागात दुकाने बंद करण्यावरून दगडफेक झाली़ त्याचे लोण शहरात पसरले़ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात अनेक कार्यकर्ते जमले होते़ येथे काही पदाधिकाऱ्यांची भाषणे सुरू असताना घोषणाबाजी सुरू झाली़ त्यानंतर काही जणांनी वसमत रस्त्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रास्ता रोको केला़ तर काही जणांनी विसावा कॉर्नर भागात दगडफेक केली़ त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही दगडफेकीला सुरुवात झाली़ यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगविला़ त्यानंतर शहरातील दर्गा रोड परिसरात दुकाने बंद करण्याचे आवाहन काही तरुण करीत होते़ यावेळी झालेल्या वादातून तेथेही दगडफेक झालीपोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले़ त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते नियोजित महात्मा फुले यांचा पुतळा या रस्त्यावरही जमावाने काही दुकानांवर दगडफेक केली़ येथे पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली़ बराच वेळ पोलीस आंदोलकांना हुसकावण्याचा प्रयत्न करीत होते़ परंतु, आंदोलक परत जात नव्हते़ पोलिसांनी नंतर कडक भूमिका घेतल्यानंतर जमाव पांगला़ शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील कार्यकर्त्यांनाही निघून जाण्याचे पोलिसांनी आवाहन केले़ शहरातील उड्डाणपुलावर पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक झाली़ दगडफेकीच्या घटनांमुळे शहरातील वसमत रस्ता, जिंतूर रोड, गंगाखेड रोड, पाथरी रोड आदी भागातील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती़ ठिक ठिकाणी रस्त्यावर टायर जाळण्यात आले़ दुपारी १़३० नंतर परिस्थिती आटोक्यात आली़ पोलीस कर्मचारी अन् आंदोलकही जखमीदगडफेकीच्या घटनेमध्ये शहरातील विविध ठिकाणी जमावाला नियंत्रित करीत असताना झालेल्या दगडफेकीत पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले़ शिवाय जवळपास ८ ते १० आंदोलक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली.